विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या संचालकाला अटक
(श्रीराम कांदु)
अंबरनाथ – विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या संचालकाला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे.अफान रशीद शेख (रा. पुणे) असे या इसमाचे नाव असून तो गार्डीयन दंत महाविद्यालयाचा संचालक आहे.
येथील चिखलेली परिसरातील गार्डीयन दंत महाविद्यालय या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी २०१७ साली मुंबई येथील सुरज यादव या विद्यार्थ्याने २ लाख डोनेशन आणि धनादेशाद्वारे १ लाख ९१ हजार भरले होते. मात्र या दंत महाविद्यालयाची मान्यता रद्द झाली असल्याने त्याचा प्रवेश झाला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पैसे परत मिळावे म्हणून संचालक अफान याच्याकडे वारंवार मागणी केली. परंतु त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर सुरजच्या काकांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संचालक अफान विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.या आधी देखील अफानवर महाविद्यालयसंबंधी दोन गुन्हे दाखल आहेत.