वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे डोंबिवलीत ७० टक्के प्रदुषण….
डोंबिवली दि.१९ – कल्याण डोंबिवलीत शहरी भागात वायु प्रदुषणाचे मुख्य स्त्रोत वाहने,कारखाने,चालू असलेली बांधकामे,ही असून त्यामुळे सल्फर डायाऑक्सिड,नाट्रोजन ऑक्सइंड,धुलीकरण इत्यादि प्रदुषके हवेत मिसळतात. हे वायु आरोग्याला हानीकारक असून शहरात होणारे वायु प्रदुषण हे मुख्य ७० टक्के वाहनांमधून निघणऱ्या धुरामुळे ,२५ टक्के औद्योगिक क्षेत्रामुळे होत असल्याचा निष्कर्ष कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २०१७ च्या पर्यावरण अहवालात मांडण्यात आला असून यासाठी काही शिफारशी देखील करण्यात आल्या आहेत.
डोंबिवलीत मोठया प्रमाणात वाहनांची संख्या असून यासाठी विविध भागात वाहनांची प्रदुषण नियंत्रण चांचणी सेंटर्स (पी यु सी )काढण्यात आली आहेत मात्र ही सेंटर्स वाहनांची तपासणी न करता पैसे घेऊन पावती देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.या पी यु सी सेंटर केंद्रावर उपप्रदेशिक परिवहन विभागाचे नियंत्रण असले तरी या विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही.खाजगी संस्थेला याचे कंत्राट देण्यात आले असून कंत्राटदार व अधिकारी यांच्यातील साटेलोटे असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद केले आहे की मोटर वाहतूक हा हायड्रोकार्बनचा महत्वाचा स्त्रोत आहे यामुळे डोळ्याची जळजळ ,फुफुसाची प्रणवायु वाहुन नेण्याची क्षमता कमी होणे,व कार्बन मोनोक्साईड रक्तात सहज शोषला जाणारा वायु आहे यामुळे डोकेदुखी,श्वसनास त्रास हि लक्षणे आढळतात यामळे लहान मुले,गरोदर महिला,ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यास हानीकारक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
पर्यावरण अहवालात वायु प्रदुषण कमी करण्यासाठी काही शिफारशी करण्यात आल्या आहेत.जास्तीत जास्त ठिकाणी हवेची पातळी तपासण्यात यावी,रस्त्याच्या दुतर्फा अधिकाधिक झाडे लावावीत,वाहनांची नियमित पी यु सी चांचणी करावी अशा महत्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.मात्र याकडे महापालिका प्रशासन व उपप्रदेशिक परिवहन विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पी यु सी सेंटर्स खाजगी ठेकेदाराकडे देण्यात आली असून त्याचेवर कोणतेही नियंत्रण नाही,वाहनांची तपासणी न करताच पैसे घेऊन पावती दिली जाते हे नुकतेच निदर्शनाला आले आहे.यामुळे प्रदुषण कमी होण्यापेक्षा ते वाढत आहे.यामुळे प्रदेशिक परिवहन विभागाने अधिक सतर्क रहाण्याची गरज आहे.कल्याण डोंबिवलीत बहुसख्य वाहने सी एन जी वर असताना हवेतील प्रदुषण का कमी होत नाही याचा अभ्यास करण्याची गरज आहे.