वारजे मध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड
(म.विजय)
पुणे – वारजे माळवाडी भाग गेल्या काही दिवसांपासून शांत झाल्यासारखे चित्र निर्माण झाले असतानाच, आज गुरुवार (दि.१७) पहाटे पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी मोटारी अज्ञातांनी दगड, बांबू मारून फोडल्याची घटना समोर आली आहे. तर यावेळी मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावलेली असताना अज्ञातांनी हा डाव साधल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वारजे गावात काल बुधवार (दि.१६) भर दुपारी झालेल्या बराटे कुटुंबियांच्या घरात घरफोडी झाल्याच्या घटनेने वारजे हादरले असताना, त्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यावर रात्रभर नाकाबंदी लावण्यात आली होती. मात्र याच संधीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी सह्याद्री शाळेपासून वारजे रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, दत्तनगर, युवराज कॉर्नर येथे लावण्यात आलेल्या मोटारींना लक्ष करत, पाच मोटारींच्या काचा दगड, बांबू मारून फोडल्याचे समोर आले आहे.
याबाबत गणपत दादा घोडके (वय.३० रा.वारजे, पुणे) यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली असून, या हल्ल्यात स्विफ्ट डिझायर क्र. एमएच १२ केएन ७२४८, मारुती इको मोटार क्र. एमएच १२ केएल ४७२७, इंडिका व्हिस्टा मोटार क्र. एमएच १२ केएल २७३०, मिनी बस क्र. एमएच १२ एनएक्स ८३२६ आणि टेम्पो क्र. एमएच ०४ सीई ५८२६ यांचे नुकसान झाले आहे.
याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे गुन्हे प्रकटीकरण शाखेने हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. तर पुन्हा एकदा अशाप्रकारचे गुन्हे सुरु होण्याअगोदरच वारजे पोलिसांनी गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे.