वज्रेश्वरी मंदिरावरील दरोड्याचा उलगडा,2 लाख 83 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त, 5 जणांना अटक, 3 आरोपी फरार

(म. विजय)

ठाणे जिह्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी मंदिरावरील दरोड्याचा उलगडा झाला आहे. सदर दरोडा प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दरोड्यातील 2 लाख 83 हजार 36 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. लाखो भाविक मंदिराला भेट देऊन नवस बोलत असतात. 10 मे रोजी पहाटे 3.10 वाजता वज्रेश्वरी मंदिराच्या मागील बाजूने 5 दरोडेखोरांनी प्रवेश करत मंदिराच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय वायरने बांधून दानपेट्या फोडून 7 लाख 10 हजारापेक्षा अधिक रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धार्मिक स्थळावर दरोडा पडल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी गंभीर दखल घेत विशेष पथकाची नेमणूक केली होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाने दरोड्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱयाने दिलेल्या माहितीच्या आधारे दादरा नगर हवेली, जव्हार आणि शहापूर येथून 5 जणांना ताब्यात घेतले. गोविंद गिंभल (जव्हार, पालघर), विनीत चिमडा (अघई, शहापूर), भारत वाघ (अघई, शहापूर), जगदीश नावतरे (अघई, शहापूर), प्रविण नावतरे (अघई, शहापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस तपासात अजून तिघांनी त्यांना मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने तिन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. अटक केलेले आरोपी हे 19 ते 26 आणि एक आरोपी 35 वर्षे वयाचा आहे.

दरोड्याच्या दिवसापासून काही दिवसांपूर्वी येथे जत्रा झाल्याने दानपेटीतील रक्कमेची मोजणी बाकी होती. या दरम्यान दरोडेखारोंनी मंदिर आणि परिसराची रेकी केली होती. 10 मे रोजी पहाटे त्यांनी दरोडा टाकण्याचा कट रचला. पहाटे 3 च्या सुमारास सुरक्षारक्षकाला वायरने बांधून पु ड्रायव्हर, लोखंडी कटावणीच्या सहाय्याने मंदिराचा लाकडी दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला होता. मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील 7 लाख 10 हजारांची रक्कम गोण्यांमध्ये भरुन मोटारसायकल आणि कारने फरार झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी पैशाची वाटणी करुन दादरा नगर हवेली आणि पालघर तालुक्यातील जव्हार तालुक्यात पळ काढला होता.

पोलिसांनी कौशल्याने तपास करुन दादरा नगर हवेली, जव्हार आणि शहापूर येथून आरोपींना अटक करत त्यांच्याकडून दरोड्यातील रक्कमेपैकी 2 लाख 83 हजार 36 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच दरोड्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली असून फरार आरोपींचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर, अभिजीत भुपेंद्र टेलर, सहाय्यक फौजदार अनिल वेळे, हवालदार अर्जुन जाधव, किशोर वाडीले, अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, प्रदीप टक्के, हनुमंत गायकर, दिपक गायकवाड, मनोज चव्हाण, पोलीस शिपाई सतिश जगताप, राजेश श्रीवास्तव, गणेश शिरसाट, भागीरथ मुंढे अशा पथकाने आरोपींना अटक केली. पुढील तपास गणेशपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email