लोकलमध्ये गर्भवतीने दिला गोंडस बाळाला जन्म ;कल्याण-डोंबिवली प्रवासादरम्यानची घटना

डोंबिवली  – गुरुवारी रात्री डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्र. 3 वर मोठा गलका झाला. तेथे कल्याणहून येऊन थांबलेल्या एका लोकलमध्ये गर्भवती महिला प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळत होती. मात्र काही वेळातच या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याने लोकलच्या डब्यातील वातावरण सुखावले. प्रवाश्यांपैकी अनेक महिला पुढे आल्या आणि त्या महिलेला तिच्या नवजात बाळासह पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
नाशिकमध्ये राहणारी रूपाली आंबेकर ही महिला गरोदर असल्याने ती कल्याणच्या वालधुनी येथे आपल्या माहेरी आली आहे. तिच्यावर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याच दरम्यान पोटात दुखू लागल्याने गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास तिचे वडील तिला डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास निघाले. त्यांनी ९ वाजून २०मिनीटांनी कल्याण येथून लोकल पकडली. मात्र या लोकलने कल्याण स्थानक सोडताच रुपलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिने काही क्षणातच एका गोंडस बाळाला जन्म दिला. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी मदतीसाठी सदर लोकलमध्ये धाव घेत रुपलीसह तिच्या बाळाला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रुपाली आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत. गर्भवती रूपालीला हॉस्पिटलमध्ये नेणारे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल के. व्ही. राजपूत व डी. एल. जगदाळे या दोघांचे रुपाली आणि तिच्या कुटुंबाने आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published.