लिफ्टमध्ये अडकून एका 7 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू – पुण्यातील घटना
7 वर्षाच्या चिमुरडीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही पुण्यातील मोमीनपुरा येथील झोहरा कॉम्प्लेक्समध्ये घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नशरा रेहमान खान असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे. खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजीमा रेहमान खान यांनी नशराला मोमीनपुरा येथील झोहरा कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या आजीकडे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सोडले होते. त्यानंतर नशरा ही दिवसभर घरीच खेळत होती.
मात्र पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास नशरा ही बाहेर खाऊ आणण्यासाठी आजीकडून पैसे घेऊन लिफ्टमध्ये गेली. यावेळी आजीला अचानक ओरडण्याचा आवाज यायला लागला. त्यामुळे आजीने धावत लिफ्टजवळ जाताच, नशरा लिफ्टमद्ये अडकल्याचं दिसून आलं. यानंतर स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करुन नशराची सुटका केली. यानंतर नशराला जवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून सध्या नशराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची चौकशी करण्यात येते आहे.