लाच घेताना पकडलेला आरोपी ‘एसीबी’च्या कार्यालयातून फरार
लघुशंकेचा बहाणा करून कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून फरार
(म.विजय)
बीड – लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने शनिवारी धारूर येथे सहा. पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांसह अन्य दोघांना ४० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. मात्र, चौकशी सुरु असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी एसीबीच्या कार्यालयातून फरार झाला.
खंडणीच्या गुन्ह्यातून एकाचे नाव वगळण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक केळे यांनी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. सदर तक्रारीवरून बीड एसीबीने सापळा रचून तडजोडीअंती तक्रारदाराकडून ४० हजार रूपयाची लाच घेताना सहा. पोलीस निरीक्षक केळे, सहाय्यक उपनिरीक्षक अमीर इनामदार, पोलीस कर्मचारी बिक्कड यांच्यासह छत्रभुज साहेबराव थोरात व अशोक हंडीबाग या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध धारूर पोलिसात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीसाठी या सर्वांना एसीबीच्या बीड कार्यालयात आणले होते.यावेळी चौकशीच्या दरम्यान छत्रभुज थोरात हा लघुशंकेचा बहाणा करून कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून फरार झाला.याप्रकरणी एसीबीचे भाऊराव राठोड यांच्या फिर्यादीवरून छत्रभुज थोरात याच्यावर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.