लवकरच बस, ट्रक विजेवर चालणार!
नवी दिल्ली दि.२० – रेल्वेप्रमाणे बस आणि ट्रक विजेवर चालविण्याचा केंद्र सरकारचा विचार पुढे आला आहे. यासंदर्भात आखणी केली जात असून, यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मदत होईल, असा उद्देश आहे. मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर हा प्रयोग करण्याचा विचार आहे
मुंबई-दिल्ली नव्या महामार्गावरील शेवटच्या मार्गिकेवर बस व ट्रकसाठी इलेक्ट्रिक लाईन टाकली जाणार आहे. प्रवासी आणि वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाला तर येत्या काळात देशभर तो राबविण्यासाठी सकारात्मक संकेत मिळतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत तज्ज्ञांना अभ्यास करण्याची सूचना दिल्याचे समजते. कारण, हा उपक्रम किती व्यवहार्य ठरेल, याची चाचपणी सरकारकडून केली जाणार आहे. देशातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे ध्वनी व वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. दुसर्या बाजूला इंधन दरवाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय, इंधन दरवाढीचा महागाईवरही परिणाम दिसून येत आहे. मात्र, विजेवर वाहने धावण्यासाठी तिची आपल्या देशातील उपलब्धता आणि गरजेनुसार त्यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असणारी साधने, याचा मेळ घालणे क्रमप्राप्त ठरणार आहे. या शिवाय सध्याच्या वाहतूक व्यवस्थेत काही बदल करावे लागतील का, याचाही विचार तज्ज्ञांच्या समितीला करावा लागेल. बस आणि ट्रकच्या माध्यमातून अनुक्रमे प्रवासी, माल वाहतूक होत असल्याने इंधन बचतीचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.