रेल्वे भर्ती नियामक मंडळाकडून महत्वपूर्ण भर्ती मोहीम
रेल्वे भर्ती नियामक मंडळातर्फे लेव्हल-1 मधील पदांच्या भर्तीसाठी 1 कोटीहून अधिक उमेदवारांकरता परीक्षा घेण्यात येत आहेत. देशातल्या 400 हून अधिक केंद्रात ही परीक्षा घेण्यात येत असून दर दिवशी 3 ते 4 लाख उमेदवार परीक्षेला उपस्थित राहत असून उपस्थितीची टक्केवारी 60 टक्क्यांवर आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे सुलभ व्हावे म्हणून प्रवेश पत्रावरच गुगल लिंक नकाशा पुरवण्यात आला आहे. लेव्हल-1 मधील एकूण 62,907 रिक्त जागांसाठी ही परीक्षा होत आहे. रेल्वे भर्ती नियामक मंडळ भारतीय रेल्वेसाठी ही परीक्षा घेत आहे. डिसेंबर 2018 पर्यंत 51 दिवसांच्या कालावधीत ही परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या महत्वपूर्ण परिक्षांसाठी भारतीय रेल्वेने चोख व्यवस्था केली असून ही परीक्षा ऑनलाईन आहे. या परिक्षेसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जात असून परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.