रिंगरुट, मोटागाव-माणकोली मार्गातील जागांच्या टीडीआरचा तिढा सुटणार

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही प्रकल्पांना वेग

कल्याण – कल्याण रिंगरुट आणि मोटागाव-माणकोली रस्ता हे कल्याण आणि डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प असून टीडीआरची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिका पावले उचलत नसल्यामुळे या प्रकल्पांमध्ये दिरंगाई होत असल्याची बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली असता ज्या जमिनींच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही, त्यांना टीडीआर देण्याची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करण्याची ग्वाही आयुक्त गोविंद बोडके यांनी बुधवारी दिली. तसेच, मोटागाव येथे यासंदर्भात लवकरच एका कँपचे आयोजन करण्याची सूचनाही त्यांनी मान्य केली. दुर्गाडी ते गांधारे टप्प्याच्या कामात फारशी अडचण नसल्यामुळे या टप्प्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची सूचना एमएमआरडीएला करण्यात आली.

कल्याण आणि डोंबिवलीतून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंगरुट आणि मोटागाव-माणकोली खाडी पुल हे दोन्ही प्रकल्प अतिशय महत्त्वाचे आहेत. मोटागाव-माणकोली खाडी पुलाचे काम झाल्यानंतर मुंबई-ठाण्याहून थेट डोंबिवलीला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. परंतु, डोंबिवली पश्चिमेतील रस्ते अरुंद असल्यामुळे या खाडीपुलाच्या कामाबरोबरच रिंग रुट प्रकल्पातील मोटागाव-दुर्गाडी आणि मोटागाव-हेदुटणे या टप्प्यांची कामेही मार्गी लागणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकरी जमिनी देण्यास तयार असूनही महापालिका टीडीआर देण्याची कारवाई करत नसल्यामुळे प्रकल्पांना दिरंगाई होत असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी आयुक्त बोडके यांना सांगितले. कल्याण-डोंबिवलीशी संबंधित विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी महापालिका मुख्यालयात खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आयुक्त बोडके यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, महानगरप्रमुख विजय साळवी, नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, निलेश शिंदे, प्रमिला पाटील, प्रेमा म्हात्रे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंते डहाणे, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रिंगरुटच्या प्रकल्पाचे सात टप्पे करण्यात आले असून चौथ्या ते सातव्या टप्प्याच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या ते तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया बाकी आहे. या टप्प्यातील काही भाग सीआरझेडमध्ये असून टीडीआर धोरणासंदर्भात महापालिका कारवाई करत नसल्यामुळे कामात दिरंगाई होत असल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी मांडली. ज्या जमिनींच्या बाबतीत कुठलीही अडचण नाही, अशा जमिनींच्या मोबदल्यात टीडीआर देण्याच्या कार्यवाहीला त्वरित सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त बोडके यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी लवकरच एका कँपचेही आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मोटागाव-दुर्गाडी पट्ट्यातील संयुक्त मोजणी अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणार असून त्यानंतर लागलीच टीडीआरची कारवाई सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हेदुटणे, भोपर आणि माणगाव या ठिकाणी संयुक्त मोजणी अद्याप बाकी असून येथील प्रकल्पग्रस्तांची लवकरच बैठक आयोजित करून त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही बोडके यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे बीएसयूपीच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी केंद्राची मंजुरी आवश्यक असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email