राष्ट्रीय मतदार दिनी करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीने युवा मतदारांमध्ये चैतन्य

 राज्यातील सर्वाधिक तृतीयपंथी मतदारांची नोंदणी ठाण्यात;

वर्षभरात २ लाख ११ हजार नवीन मतदार

(श्रीराम कांदु)

ठाणे दि २५: ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे ३३० एवढ्या तृतीयपंथीची ( थर्ड जेन्डर) मतदार म्हणून नोंदणी झाली असून गेल्या वर्षभरात २ लाख ११ हजार नवीन मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासन करू शकले आहे. आज आठव्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ही माहिती जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची शपथ उपस्थितांना दिली.

दोन दिवसांपासून ज्यांची  उत्सुकता होती त्या प्रसिध्द अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीमुळे गडकरी रंगायतनमधील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. या दोघींनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजेच, तो आपला हक्क आहे असे सांगितले आणि उपस्थितांकडून वदवून घेतले.

कार्यक्रमात बोलतांना प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनी देखील “मतदार नोंदणी आरंभ हाच राष्ट्र भक्तीचा शुभारंभ” असे घोषवाक्य दिले. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील,  अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक भीमनवार, जिल्हा सैनिक अधिकारी प्रांजळ जाधव यांची  उपस्थिती होती.

सध्या ठाणे जिल्ह्यात ५९ लाख २७ हजार ७ इतके मतदार आहेत. सेना दलातील मतदारांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली असून जिल्ह्यातील  २ हजार १८६ जणांनी मतदार नोंदणी  केली आहे . यावर्षी प्रथमच ERO NET पद्धत वापरण्यात आली. म्हणजे मतदार नोंदणी करतांना मतदारांची कागदपत्रे स्कॅन करून जतन करून ठेवण्यात येतात. अशी प्रणाली वापरणारा महाराष्ट्र हा देशात दुसर्या क्रमांकावर आहे. या पद्धतीत ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ६९६ इतक्या मतदारांची नोंदणी झाली अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनीही मतदानाचे महत्व विषद केले. याप्रसंगी भारताचे मुख्य निवडणूक ओमप्रकाश रावत यांचा देखील दृकश्राव्य संदेश दाखविण्यात आला.

सहस्त्रक मतदार, दिव्यांग मतदारांचा सत्कार

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ज्यांचा जन्म १ जानेवारी २००० रोजी झाला असून मतदार नोंदणी केली आहे अशा  सहस्त्रक मतदारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दिव्यांग युवा मतदारांचाही सत्कार झाला. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय निवडणूक विषयक सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या मुलांचाही गौरव करण्यात आला. सैन्यदलातील नव्याने मतदार म्हणून नोंदणी  झालेल्या मुकेश कांबळे, आर सी शर्मा, जयंत गोगटे, जगन्नाथ सिन्नरकर, शिवालीनाथ थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.

शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनगाणी या प्रसाद महाडकर यांच्या वाद्यवृंदाने आणि गायिका सोनाली कर्णिक, मंदार आपटे यांच्या गीतांनी सभागृहात ठेका धरायला लावला. योगेश भिडे यांच्या मतदारांसाठी असलेल्या पथनाट्यानेही वाहवा मिळविली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email