रालोआ सरकारने आणलेल्या योजनांमुळे जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

मुंबई, दि.24 – राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आणलेल्या योजनांमुळे जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेला संवाद आपल्यासाठी शिकण्याचाच अनुभव होता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांकडे सांगण्यासाठी यशोगाथा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दूरदूरच्या खेड्यातल्या महिला सामाईक सेवा केंद्राद्वारे निवृत्तीवेतनापासून ते ज्येष्‍ठ नागरिकांना पारपत्र मिळवून देण्यापर्यंत सेवा पुरवित आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने बंगलुरुमध्ये खाजगी व्यावसायिक आणि माहिती तंत्रज्ञान अभियंत्यांनी एकत्र येऊन समृद्धी ट्रस्ट स्थापन केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा आधार घेत सेंद्रिय शेती करण्याचे प्रशिक्षण आणि शेतात नगदी पिकाबरोबरच इतर पिके कशी घ्यावीत याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

वस्तू आणि सेवा कर हे सहकार्यात्मक संघीयवादाचे उत्तम उदाहरण असून, देशहितासाठी सर्व राज्यांनी एकमताने निर्णय घेतला. वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी देशात 17 विविध कर होते मात्र आता संपूर्ण देशात एकच कर लागू असल्याचे ते म्हणाले.

समाजातल्या अनिष्ट रुढींचे निर्मुलन करुन मानवतेचा प्रसार करण्यात संताच्या मोठ्या योगदानाचे स्मरण त्यांनी केले. कबीरांच्या दोह्यांचा उल्लेख करत आजच्या आधुनिक युगातही ते स्फूर्तीदायी आणि समर्पक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. समाजातल्या जातीवर आधारित भेदभाव नष्ट करण्याची शिकवण गुरुनानक यांनी दिली. जालीयनवाला बाग इथल्या भयावह घटनेला पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतील, असे सांगून हिंसाचार आणि क्रौर्य यांचा आधार घेऊन कोणताही प्रश्न सुटत नाही, हाच संदेश यातून मिळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शांतता आणि अहिंसा यांचाच अंतिम विजय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

योगाभ्यास सीमेची बंधन झुगारुन जनतेला एकत्र आणतो, असे सांगून चौथा आंतरराष्ट्रीय योगदिन जगभरात साजरा झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email