रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आर्थिक जनतंत्र परिषद,नोकऱ्या मागणारे नव्हे,तर देणारे बना- राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद

(श्रीराम कांदु)

ठाणे दि १४: उद्योग – व्यवसायातील छोट्या मोठ्या संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बना असा मंत्र देशाचे राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद यांनी आज येथे दिला.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आर्थिक जनतंत्र परिषद( इकोनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह) चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नॉलेज एक्सलन्स सेंटर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांचीही उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आर्थिक आणि सामाजिक समानता ही देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करेल असे सांगितले.

या परिषदेत ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले २०० यशस्वी उद्योजक सुद्धा होते.

उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे हि केवळ सरकारची जबाबदारी नाही असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की, संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो अशी अगतिकता असू नये तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेल पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेल, स्वत:चा व्यवसाय सुरु करेल अशी भावना त्यामागे हवी असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की, समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. “डिक्की”सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्धल राष्ट्रपतींनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे कौतुक केले.

महिलांनी गुंतवणुकीची मनोवृत्ती ठेवावी

आर्थिक जनतंत्रात बँकांची भूमिकाही महत्वाची असून पंतप्रधान मोदी यांनी जनधन योजना आणल्यामुळे ३० कोटीहून अधिक लोकांनी बचत खाती उघडली, ज्यात ५२ टक्के महिला आहेत. डायरेक्ट बँक ट्रान्सफरमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आणि अशा खात्यांमध्ये विविध लाभांचे पैसे थेट जमा होऊ लागले  असे सांगून राष्ट्रपती म्हणाले कि, विशेषत: महिलांनी आता केवळ बचत करण्याची प्रवृत्ती सोडून गुंतवणूक करायला शिकले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मुलत: एक अतिशय विद्वान असे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याच सूचनेप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती तसेच त्याकाळी त्यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याची टेंडर्स ही दुर्बल आणि वंचित घटकाला मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती.

ठाणे, पालघर, मुंबई हा भाग ऐतिहासिक काळापासून व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध आहे. वडा पाव विक्रेत्यापासुन ते मोठमोठे उद्योगपती याठिकाणी सक्रीय आहेत. येथे असलेल्या अनेक संधींचा फायदा युवकांनी घ्यावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

मी एक प्रशिक्षणार्थी ………

रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीमध्ये मी यापूर्वी १० ते १२ वेळा आलो आहे ते विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यासाठी. एक तुमच्यासारखाच प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून तसेच आताचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या आवारात आज मी राष्ट्रपती म्हणून आलो तरी येथील अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी या संस्थेच कुठे कुठे भेट दिली, कसा राहिलो, कसा शिकत गेलो हे सगळे आठवले अशा शब्दांत  राष्ट्रपतींनी आपल्या आठवणीना उजाळा दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या या विनम्र आणि साध्या सरळ निवेदनाने भारावलेल्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला.

युवा उद्योजकांचा देश- मुख्यमंत्री

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा परिषदेमुळे आणि त्यातील अनुभव कथनामुळे प्रगतीचा नवा मार्ग आपल्याला मिळेल. सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी  खूप प्रयत्नांची गरज आहे मात्र प्रधानमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली असून वंचित आणि दुर्बल घटकाना देखील आर्थिक अधिकार मिळतील अशा योजना आल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आजची युवा शक्ती ही देशाची  मोठी ताकद आहे, त्यांच्यात कल्पकता व नवनिर्माणाचा दृष्टीकोन आहे. गरज आहे ती त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची. यासाठी स्टार्ट अप, मुद्रा, कौशल्य विकास यासारख्या योजना महत्वपूर्ण आहेत. भारत हा केवळ युवकांचा नाही तर युवा उद्योजकांचा देश म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष अनिरुध्द देशपांडे यांनी आभार मानले. श्री मिलिंद बेटावदकर आणि रवींद्र साठे यांनी सूत्रसंचालन केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email