राणेंना मंत्रिमंडळात घेतील तेव्हा पाहू : उद्योगमंत्री सुभाष देसाई
(श्रीराम कांदु)
राज्य मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करण्याला शिवसेनेने विरोध केलेला नाही. मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजपाने असा निर्णय घेतलाच तर तेव्हाचे तेव्हा बघू आणि काय करायचे ते ठरवू. भाजपाला आमच्या शुभेच्छा आहेत, असा गर्भित इशारा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी डोंबिवलीत बोलताना दिला.
गुरूवारी सायंकाळी एका खासगी कार्यक्रमासाठी सुभाष देसाई डोंबिवलीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. भाजपाच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र भाजपा सोबत सत्तेत असताना शिवसेनेने सरकारच्या त्रीवर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजपाचे घोटाळेबाज मंत्री नावाची पुस्तिका काढल्याबद्दल देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, अशा प्रकारची पुस्तिका काढल्याचे आपणही ऐकले आहे. मात्र अद्याप ही पुस्तिका पाहिली नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेता तथा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी उपस्थित होते.