राज ठाकरेंच्या ‘इंजिना’ला सापडलाय ट्रॅक
राज ठाकरे नुकतेच विदर्भात जाऊन आले. विशेष म्हणजे, या दौऱ्यात त्यांचा भर शहरी भागांवर नव्हता. ते आदिवासी भागांत गेले, लोकांना भेटले, त्यांच्या घरी जेवले, ते कशा परिस्थितीत जगताहेत हे त्यांनी अनुभवलं. अर्थात, असं करणारे ते काही पहिले नेते नाहीत. असे फंडे वापरून मतं मिळतातच असंही नाही. पण, राज यांचं जमिनीवर बसणं बरंच काही सांगून जाणारं आहे. त्यांना ‘इंजिन’ रुळावरून घसरू द्यायचं नाहीए, फक्त उपद्रवमूल्य असलेला पक्ष ही मनसेची प्रतिमा ते बदलू इच्छितात. तसंच, आपल्यावरचा ‘शहरी’ हा शिक्काही त्यांना पुसायचा आहे. हे काम सोपं कधीच नव्हतं. त्यात, १२ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असल्यानं राज यांच्यासाठी तर ते महाकठीण झालंय. पण, एक गोष्ट त्यांना मोठा आधार देणारी आहे. या दौऱ्यादरम्यान ती प्रकर्षाने जाणवली. राज ठाकरे यांच्याबद्दलचं आकर्षण, त्यांची क्रेझ अजूनही कायम आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा केला होता. आपल्या समर्थकांना काय वाटतंय, किती जण आपल्यासोबत आहेत, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं मत काय, नवा पक्ष काढला तर काय होईल, याची चाचपणी करण्यासाठी ते राज्यभर गेले होते. या दौऱ्याचा पहिला टप्पा मुंबई-ठाणे-नाशिक-धुळे-औरंगाबाद असा होता. या दौऱ्यात पत्रकार म्हणून सहभागी होता आल्यानं तेव्हाचा माहोल जवळून बघता आला. राज यांच्या गाड्यांमागे बाईकस्वार तरुणांच्या रांगा, अनेक गावांच्या वेशीवर होणारं स्वागत आणि जयजयकार, राज ठाकरेंच्या भेटीसाठी शासकीय निवासस्थानांबाहेर जमणारी गर्दी, त्यांच्या सभांना मिळणारा तुफान प्रतिसाद हे सगळं अद्भुतच होतं. ही गर्दी जमवलेली नव्हती. कारण, राज ठाकरे आपल्यासाठी काहीतरी करतील, अशी आशा तरुणाईच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. पण, त्यानंतर काय झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. राज ठाकरे यांची कोरी पाटी मतदारांनी भरली, पण मनसेनं त्यांची स्वप्नं पुसून टाकली. म्हणूनच, राज यांची पाटी पुन्हा कोरी झालीय. या धड्यातून बोध घेतला नाही तर पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकेल, याची जाणीव ‘साहेबां’ना झाली असावी. म्हणूनच त्यांनी ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींचा मंत्र अवलंबला.