राज्य शासनाने डी.बी.टी. योजनेतील त्रुटी त्वरित दूर कराव्यात – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

(श्रीराम कांदु )

 कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगर पालिकेच्या सिमला पार्क येथील शाळेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. मराठी व उर्दू माध्यामाचे वर्ग या शाळेमध्ये भरतात. येथील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी विविध माध्यमातून खा.डॉ. शिंदे यांच्यापर्यंत पोचल्या. या तक्रारींची तातडीने दखल घेत शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. राज्य शासनाच्या डी.बी.टी. म्हणजेच डायरेक्ट बेस ट्रान्स्फर या योजनेमुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश अजून देखील घेता आलेला नाही. या योजनेप्रमाणे पालकांनी प्रथम स्वखर्चातून विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तर घेऊन द्यावे व नंतर योजनेमार्फत पैसे मिळणार आहेत. मात्र अनेक पालक आर्थिक परिस्थीतीमुळे या वस्तू घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या योजनेला पालकांचा विरोध आहे. या योजनेतील त्रुटी दूर करून ही योजना सक्षमपणे राबविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांसोबत लकरच भेट घेणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. या परिसरात १४ शाळा असून ५४०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मुंब्रा येथील सिमला पार्क शाळा महापालिकेची शाळा असून महापालिकेमार्फत शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी विद्यार्थ्यांनी बसण्याकरता बाकडे नाहीत, वर्गखोल्यांमध्ये लाईट्स नाहीत, शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयांची संख्या अपुरी असून याकरता मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करावी असेही निदर्शनास आणले. यावर खा.डॉ. शिंदे यांनी पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना या तक्रारींची तातडीने दखल घेऊन योग्य त्या सुधारणा करण्याचे आदेश दिले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप-पहापौर रमाकांत मढवी, युवा सेना अधिकारी सुमित भोईर, शिक्षणाधिकारी मनिष जोशी, माजी नगरसेवक सुधीर भगत, अन्वर कच्छी व पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेमध्ये पटसंख्ये पेक्षा उपस्थिती कमी असल्याचे या पाहणी दरम्यान आढळून आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता शाळेमध्ये १६ शौचालये आहेत. मात्र त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे विद्यार्थीनिंना अनेक अडचणी येत आहेत. तसेच आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा होत असल्याने येथील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच शाळेमध्ये वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक रूम, जाण्या-येण्यासाठी महापालिकेच्या परिवहन सेवेची उपलब्धता करावी या सारख्या अनेक समस्या खा.डॉ. शिंदे यांच्यासमोर मांडल्या. या समस्यांबाबत अनेकवेळा पालिकेच्या शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून देखील याबाबत काहीही उपाय योजना करण्यात येत नसल्याचे येथील शिक्षक व नागरिकांनी सांगितले. या सर्व तक्रारींची दखल घेत खा. शिंदे यांनी लवकरच पालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन या समस्यांवर तोडगा काढला जाईल असे सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email