राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश कोलीवली गणातील ३८/६ मतदान केंद्रावर पुनर्मतदान २६ डिसेंबर रोजी
राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
कोलीवली गणातील ३८/६ मतदान केंद्रावर
पुनर्मतदान २६ डिसेंबर रोजी
ठाणे दि २२ : भिवंडी तालुक्यातील ७६ कोलीवली या निर्वाचक गणाअंतर्गत मतदान केंद्र ३८/६ वर मंगळवार २६ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत पुनर्मतदान घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे मतदान केवळ ७६ कोलीवली या गणासाठीच असेल, ३८ शेलार गटासाठी नव्हे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक ३८/६ हे केंद्र ७५ शेलार या गणाऐवजी ७६ कोलीवली निर्वाचक गणास जोडण्यात येईल. तसेच या मतदान केंद्रावरील १३ डिसेंबरचे मतदान रद्द ठरविण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
अशी होईल मतमोजणी
या गणासाठीची मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून होईल. प्रथम १३ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या ३८ शेलार निवडणूक विभागातील तसेच ७५ शेलार निर्वाचक गणातील मतदान केंद्र क्रमांक ३८/१ ते ३८/५ येथील मतदान यंत्रातील मतमोजणी करण्यात येईल. तद्नंतर ७६ कोलीवली निर्वाचक गणातील मतदान केंद्र क्रमांक ३८/७ ते ३८/१२ येथील मतदान यंत्रातील मतमोजणी होईल.
यानंतर १३ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या ३८ शेलार निवडणूक विभागाच्या मतदान केंद्र क्रमांक ३८/६ येथील मतदान यंत्रातील मतमोजणी करण्यात येऊन शेवटी २६ डिसेंबर रोजी झालेल्या ७६ कोलीवली निर्वाचक गणातील मतदान केंद्र क्रमांक ३८/६ येथील मतदान यंत्रातील मतमोजणी होईल.
जिल्हाधिकारी यांनी ३८/६ मतदान केंद्रातील ९४० मतदार हे कोलीवली निर्वाचक गणातील असल्याची खात्री करून तसा पंचनामा नकाशासह आयोगाकडे सादर केला होता. हि वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या केंद्रावर पुनर्मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत