राज्यातील ३३ हजार महिला बेपत्ता
(म.विजय)
मुंबई दि.०४ – कधी प्रेमसंबंधातून, तर कधी घरगुती कलहातून तरुणी अथवा विवाहिता घर सोडून जातात. त्यांना फूस लावून पळवून नेले जाते. गेल्या १७ महिन्यांमध्ये राज्यात सुमारे ३३ हजार अल्पवयीन मुली, तरुणी, महिला हरविल्याच्या तक्रारी पोलिसांमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यात मोठ्या शहरांमधील तक्रारींची संख्या अधिक आहे. हरविलेल्या अथवा बेपत्ता मुली, तरुणी, महिलांचा शोध घेण्यात पोलिसांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसून येत आहे.
राज्यात गेल्या १ जानेवारी २०१७ ते ५ जून २०१८ या कालावधीत अल्पवयीन मुली, तरुणी, महिला अशा ३२ हजार ७६२ जणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्यात.
महेंद्र मिसर यांना माहितीच्या अधिकारातून ही मिळालेली माहिती आहे. तक्रारींची संख्या पाहता, महिला आणि विवाहितांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसते. अल्पवयीन मुलींना प्रेम प्रकरणातून फूस लावून पळवून नेले जात असल्याचे आत्तापर्यंतच्या पोलिस तपासातून समोर आले आहे.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये महिलांच्या बेपत्ताचे अथवा हरविल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातही महानगरांचा समावेश असून मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि नाशिक ही शहरे यात प्रामुख्याने आहेत.