राज्यातील शिधावाटप दुकानातून स्वस्त दरात तूर डाळ विक्रीचा शुभारंभ
राज्यातील शिधावाटप दुकानातून स्वस्त दरात
तूर डाळ विक्रीचा शुभारंभ
ठाणे दि ५: राज्यातील शिधावाटप दुकानांतून स्वस्त दरात तूर डाळ विक्रीचा शुभारंभ आज सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सानपाडा येथे झाला. ही तूर डाळ ५५ रुपये दराने एक किलोच्या पिशवीत शिधापत्रिकाधारकांना दुकानांमध्ये उपलब्ध राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तुर्भे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील श्री सप्तशृंगी कंपनी येथे तूर डाळ पुरवठा करणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सप्तशृंगी कंपनीचे लामक द्वारकानाथ राठी, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटीव्ह फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती निलीमा केरकट्टा, गजानन देसाई, शिधावाटप अधिकारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सहकार मंत्री म्हणाले की राज्यातील नागरिकांना मधल्या काळात २०० रुपये इतक्या चढ्या दराने तूर खरेदी करावी लागत होती. नाफेड आणि राज्य सरकारने ७५ लाख क्विंटल तूर डाळ खरेदी केली असून डाळीचे मिलिंग करून एक किलोच्या पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. नागरिकांना त्या ५५ रुपये किलो या दराने मिळतील यामुळे एकीकडे ग्राहकांना देखील स्वस्त दराचा लाभ होणार असून दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील हमी भाव मिळत आहे.