राज्याच्या राजकारणात लवकरच आणखी एक ठाकरे…
मुंबई दि.२७ – लवकरच राजकीय व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे दिसण्याची शक्यता आहे. कारण तशी मागणी मनसेतून करण्यात आलेय. अमित ठाकरे यांच्याकडे जबाबदारी देण्याची मागणी आहे. तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरेंना राजकीय आखाड्यात उतरविण्याची शिफारस मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या बैठकीत केली आहे.
त्यामुळे मनसेच्या आगामी कार्यक्रमांमध्ये अमित ठाकरे व्यासपीठावर दिसू शकतात. लोकसभा निवडणूक लढवण्यास मनसेचे नेते अनुकूल आहेत. मुंबईत वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे नेते आणि सरचिटणीस उपस्थित होते. आगामी निवडणुकांची व्यूहरचना ठरवणं आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबत पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मनसे नेते आणि पदाधिकारी ही निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल असल्याचे या बैठकीतून समोर आलंय.