रशियाच्या भारतातल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य मंत्र्यांकडून फास्ट ट्रॅक यंत्रणेची घोषणा

नवी दिल्ली, दि.०६ – शियाच्या भारतातल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी फास्ट ट्रॅक एक खिडकी यंत्रणा उभारण्याची घोषणा केली आहे. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

भारत-रशिया व्यापार शिखर परिषदेत ते आज बोलत होते. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खाते, इन्हवेस्ट इंडिया आणि भारतीय उद्योग महासंघ यांनी नवी दिल्लीत ही शिखर परिषद आयोजित केली आहे.

भारतात, रशियाच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी या आधीच्या रशिया डेस्क व्यतिरिक्त ही फास्ट ट्रॅक यंत्रणा राहणार आहे.

हायड्रोकार्बन, सोने, हिरे,लाकूड,कृषी,वीज निर्मिती, हवाई वाहतूक, रेल्वे आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रात सहकार्याची भारत आणि रशिया यांना संधी असल्याचे प्रभू म्हणाले.

इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर संदर्भात काम सुरु आहे. युरेशियन इकॉनॉमिक युनियन समवेत मुक्त व्यापार करारावर लवकरच स्वाक्षऱ्या केल्याने मोठी बाजारपेठ निर्माण होणार असून या क्षेत्रातल्या देशांना त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर भारतातली राज्ये आणि रशियाच्या प्रांतातल्या भागीदारीलाही यामुळे प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी सांगितले.

भारताबरोबरचे आर्थिक सहकार्य वाढविण्याचे धोरण रशिया आखत आहे. भारतासमवेत गुंतवणूक, संरक्षण आणि दुहेरी कर टाळण्यासाठीच्या करारासाठी रशिया उत्सुक असल्याचे रशियाच्या आर्थिक विकास मंत्र्यांनी सांगितले.

आर्थिक भागीदारी हा भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांचा भक्कम स्तंभ बनवण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या दोन दिवसांच्या भारत भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत आतापर्यंतचे सर्वात मोठे रशियन प्रतिनिधीमंडळ भारतात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.