रविवारी मोठागांव डोंबिवलीत गावदेवीची यात्रा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – भूमिपुत्रांचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणा-या गावदेवी मातेच्या यात्रेस मोठागांव डोंबिवलीत शनिवार 7 एप्रिल पासून सुरुवात होत आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेली ही यात्रा आता डोंबिवलीकरांच्या गावकीच्या उत्सवाचा एक भाग बनली आहे.
देवीच्या दर्शनासाठी कर्जत, कसारा, नवी मुंबई, वसई-विरार परिसरातील लाखो भाविक मोठया संख्येने यात्रेसाठी येतात. डोंबिवलीकरांचे शक्तिस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या गावदेवीला व्याघ्राईदेवी म्हणूनही ओळखले जाते. अशी माहिती गावदेवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष व माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी दिली.
डोंबिवली शहराच्या पश्चिमेला रेल्वेस्थानकापासून २ किमी अंतरावर मोठागाव आणि देवीचापाडा या दोन गावांच्या सीमेवर देवीचे भव्य मंदिर आहे. गावदेवी मंदिर संस्थान मोठागाव,ठाकुर्ली देवीचापाडा यांच्या वतीने देवीच्या यात्रेचे संयोजन केले जाते
पूर्वी देवीचापाडा परिसरात घनदाट जंगल होते. त्या वेळी मंदिरात यात्रेच्या ठिकाणी वाघ येत असत अशी आख्यायिका जुनीमंडळी सांगतात. त्यामुळे देवीची व्याघ्राईदेवी म्हणूनही ओळख आहे. दोन दिवस चालणा-या या यात्रेत मंदिराच्या भव्य प्रांगणात आनंदमेळा भरतो. या आनंदमेळ्यात आकाश पाळणे, विविध प्रकारची खेळणी, मिठीईची दुकाने थाटली जातात. देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही जंगी कुस्तीचे सामने रविवारी सायंकाळी 3 ते 7 या वेळेत होणार असून प्रथम विजेत्याला चांदीची गदा पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.