रणांगण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतोय एक वेगळा स्वप्निल

आपल्या स्वार्थासाठी एक महत्त्वाकांक्षी राजकारणी काय काय करू शकतो हे रणांगण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. रणांगण या चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक हत्या पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासूनच आपली उत्कंठा वाढत जाते. हा चित्रपट मध्यांतरापर्यंत तर आपल्याला चांगलाच खिळवून ठेवतो. पण मध्यांतरानंतर हा चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो.पण सचिन पिळगांवकर आणि स्वप्निल जोशी यांची एकत्र असलेली दृश्यं मस्त जमून आली आहेत. सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर, प्रणाली घोगरे यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. स्वप्निलने तर या चित्रपटात बाजी मारली आहे असेच म्हणावे लागेल. चित्रपटाचे संवाद देखील टाळ्या मिळवणारे आहेत. एक वेगळा स्वप्निल प्रेक्षकांना रणांगण या चित्रपटात पाहायला मिळतोय. श्यामराव देशमुख (सचिन पिळगांवकर) एक राजकारणी असतो. तो प्रत्येक गोष्टीत आपला फायदा कसा होईल याचीच संधी शोधत असतो. वरद (सिद्धार्थ चांदेकर) हा श्यामराव यांचा मुलगा असून त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला लग्नाच्या काही महिन्यातच सोडले असते तर दुसऱ्या पत्नीने लग्नाच्याच दिवशी आत्महत्या केलेली असते. या सगळ्यामुळे तो प्रचंड दुःखी असतो. त्यामुळे त्याचे वडील त्याचे लग्न सानिकाशी (प्रणाली घोगरे) ठरवतात. पण तिला प्रेमप्रकरणात अविनाश नावाच्या एका मुलाने फसवलेले असते. त्याच्यापासून तिला दिवस देखील गेलेले असतात. तिचे हे मूल स्वीकारण्याचा निर्णय श्यामराव घेतात. लग्न झाल्यानंतर ती घरात श्लोकला (स्वप्निल जोशी) पाहाते. श्लोक हा देशमुख यांचा मानलेला मुलगा असतो. तो केवळ सहा महिन्यांचा असताना श्यामरावांच्या बंगल्याच्या बाहेर त्याला सोडलेले असते. तेव्हापासून तो देशमुख यांच्या घरीच राहात असतो. पण श्लोकला पाहिल्यावर सानिका प्रचंड घाबरते. कारण अविनाश आणि श्लोक हे दोघे दिसायला अगदी सारखे असतात. तसेच त्यांच्या सगळ्या सवयीमध्ये देखील साम्य असतं. त्यामुळे श्लोक हाच अविनाश असल्याची सानिकाची खात्री असते. अविनाश आणि श्लोक हा एकच व्यक्ती आहे का? गरोदर मुलीसोबत आपल्या मुलाचे लग्न करण्यामागे देशमुखांची काही राजकीय खेळी आहे का? श्लोकचा देशमुख कुटुंबियांशी खरा संबंध काय आहे? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे रणांगण पाहिल्यावरच मिळतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email