योग दिनातून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतले तणावमुक्ती, कार्यक्षमतावाढीचे धडे
ठाणे दि.२२ – जागतिक योग दिनानिमित्त काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नियोजन भवन सभागृहात झालेल्या योगासने शिबिराचा आणि त्यानंतरच्या प्रश्नोतरांचा लाभ अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला. या योग दिनास जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, जनसंपर्क अधिकारी संगीता पवार तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
योग शिक्षिका रंजना तिवारी यांनी काही महत्वाची आणि सहजरीत्या दैनंदिन करता येतील अशी योगासने उपस्थित सहभागींना शिकविली व प्रात्यक्षिके करून दाखविली. दैनंदिन कामाचा ताण कमी करणे तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखणे यादृष्टीने सहभागी कर्मचाऱ्यांनी योग शिक्षिका यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली तसेच प्रश्नही विचारले. प्राणायाम, शवासन तसेच काही सूक्ष्म आसनांचा फायदा आपली कार्यक्षमता वाढविण्यावर कसा होतो याविषयीही यावेळी शास्त्रशुध्द माहिती देण्यात आली.