मोठ्या भावाला किडनी मिळावी म्हणून लहान भावानी केली आत्महत्या
मोठ्या भावाला किडनी मिळावी यासाठी लहान भावान आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना वलसाडजवळच्या पारडी इथे घडली आहे. मोठा भाऊ अत्यंत आजारी असून त्याच्या दोन्ही किडनी खराब झाल्यामुळे लहान भावान गळफास घेत आत्महत्या केली. परंतु त्याचा त्याग व्यर्थ गेला आहे. नैतीकुमार तांडेल हा इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात होता. बडोद्यामधल्या हॉस्टेलमध्ये त्याला गळफास घेतलेलया अवस्थेत त्याच्या सहकाऱ्याला तो आढळला. त्याने पोलिसांना व संस्थेला ही घटना कळवली. पोलिसांना आत्महत्येचं कारण सांगणारी चिठ्ठी मिळाली. या प्रकरणी कुणाचीही पोलिसांनी चौकशी करू नये असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं. नैतीकुमारनं लिहिलं होतं की त्याचा मोठा भाऊ केनीश हा अत्यंत आजारी असून त्याच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत आणि किडनीदानाची गरज आहे. माझ्या किडनी त्याला द्याव्यात तसेच अन्य अवयवही गरजूंना द्यावेत अशी इच्छा त्यानं व्यक्त केली होती, असं पोलिसांनी सांगितले. परंतु ज्यावेळी आम्हाला त्याचं शव मिळालं त्यावेळी त्या अशा अवस्थेत होतं की अवयवदान अशक्य होतं. डॉक्टरांनी शवाची तपासणी केल्यानंतर सांगितलं की त्याचा जीव जाऊन किमान ३६ तास झाले आहेत आणि आता अवयवदान करता येणार नाही.