मेडिकल स्टोर्सवर छापा मारण्यात आला असता, अटकेच्या भीतीने आत्महत्या

उल्हासनगर : 22 मार्च रोजी ठाणे अन्न व औषध प्रशासनाने उल्हासनगरातील धन्वंतरी या मेडिकल स्टोर्सवर छापा मारून गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त करून स्टोर्सच्या चालकासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला होता. काल रात्री आठच्या सुमारास पुन्हा या मेडिकल स्टोर्सवर छापा मारण्यात आला असता, अटकेच्या भीतीने महेश किंगर या चालकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर येथील कॅम्प नंबर 1 मधील सोना मार्केटच्या मागे असलेल्या धन्वंतरी मेडिकल स्टोर्स मध्ये Allophatic या गर्भपातावर उपयुक्त औषधांची अवैधरित्या खरेदी,साठवणूक आणि विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार कोकण विभागाच्या सहाय्यक आयुक्त निशिगंधा पष्टे यांनी 22 मार्च रोजी पथका सोबत धन्वंतरी मेडिकल स्टोर्स वर छापा मारून औषधांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात महेश किंगर या प्रमुख आरोपी सह आणखीन सहा संशयित अशा ७ जणांवर औषध व सौन्दर्य प्रसाधने कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र पुन्हा या स्टोर्समध्ये गर्भपातांच्या गोळ्या सर्रासपणे विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाने स्टोर्सवर रात्री छापा टाकला. ही माहिती स्टोर्सच्या बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या महेश किंगर यांना कळताच,त्यांनी राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस  ठाण्यात आकस्मिक मृत्यू चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.