मुलुंड नाक्यावर राष्ट्रवादीचे ’टोल फ्री’ आंदोलन

ठाणे  – मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करवा लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन करुन टोल न भरता गाड्याना सोडण्यात आले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, शानू पठाण ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजा राजपूरकर, अनुसूचित जाती सेलचे कैलास हावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत पवार ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, हेमंत वाणी, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रवी पालव, कुलदीप तिवारी, समीर भोईर आदींसह शहर कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने पोलिसांनी देखील या आंदोलनात हस्तक्षेप केला नही. सकाळी साडेनऊच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
मुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरु केले आहे. त्यासाठी सदरचा मार्ग बदं केला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणार्या इतर मार्गांवरील रहदारी वाढली आहे. त्यातच टोल घेण्यासाठी वाहने थांबवून ठेवली जात असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ऐरोली आणि आनंद नगर (मुलुंड) टोल नाक्यावरील टोलवसुली मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत थांबवावी; अन्यथा, कायदा हातात घेऊन टोल नाके खुले करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.
मुंब्रा बाह्यवळण मार्ग दुरुस्ती कामाला अखेर मुहूर्त सापडला दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याने वाहतूक ऐरोली, शिळफाटा मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र या पर्यायी मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला शासनच जबाबदार असल्याचा आरोप आ. आव्हाड यांनी यावेळी केला.
आव्हाड म्हणाले की, मुंब्रा बायपास हा धोकादायक झाला होता. या बायपासवरील दुरुस्तीच्या कालावधित वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी एकच टोल भरण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरुस्तीचे काम सुरु होण्यापूर्वी केली होती. त्यामुळे वाहन चालकांना एक तर ऐरोली किंवा मुलुंडचा असा एकच टोल भरावा लागणार होता. मात्र पालकमंत्र्यांची ही घोषणा हवेतच विरली असली तरी आम्हाला दोन्ही टोल मान्य नसून जो पर्यंत मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होत नाही. तो पर्यंत आम्ही टोलनाके सुरु करु देणार नाही. हे आंदोलन सुरु असतानाचच येथून पालकमंत्री गेले आहेत. मात्र, या पालकमंत्र्यांना आंदोलनाची साधी चौकशी करण्याची गरज भासत नाही, ही माणुसकीहीनतेचे लक्षण आहे. आज आम्ही सांगून हे आंदोलन केले आहे. पण, जर हा टोल बंद केला नाही तर नियमितपणे गनिमी काव्याने येथे येऊन आम्ही टोल वसुली बंद करु, असा इशाराही त्यांनी दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email