मुलींचे शिक्षण महिला सक्षमीकरणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.२३ – मुलींचे शिक्षण महिला सक्षमीकरणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे जामिया हमदर्द विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना जागतिक स्तरावर रोजगार स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान केली पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. सर्व स्तरातल्या मुलींना शिक्षण मिळाल्यास देशाचा सर्वांगिण विकास होईल, असे ते म्हणाले.
विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी सौर ऊर्जा, वर्षा जलसंचयन यांचा अवलंब केला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धन रूजवून निसर्गासोबत राहण्याचे शिक्षण त्यांना दिले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
शिक्षण केवळ पदवी, रोजगार यापुरता मर्यादित राहू नये तर शिक्षणामुळे माणूस सक्षम झाला पाहिजे, आर्थिक उन्नतीत शिक्षण सहाय्यभूत ठरले पाहिजे, असे ते म्हणाले.
तंत्रज्ञानाचे व्यसन होऊ देऊ नका आणि तंत्रज्ञानापायी माणसे आणि नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ देवू नका, असा सल्लाही उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला.