मुंबई परिसरातील १२५ शेतकरी आठवडी बाजारांमुळे शेतकरी व ग्राहकांना फायदा – पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत
( श्रीराम कांदु )
ठाणे दि २१: शासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र मिळून मुंबई आणि परिसरात १२५ शेतकरी आठवडी बाजार सुरु केले असून यामुळे शेतकरी तसेच ग्राहक या दोघांनाही लाभ झाला आहे असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले ते काल मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे नवघर भाईंदर येथे सुरु करण्यात आलेल्या शेतकरी आठवडी बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी महापौर गीता जैन उपस्थित होत्या.
भाईंदर पूर्वेकडील रामदेव पार्क आणि भाईंदर पश्चिमेकडील एलबीटी कार्यालयासमोर अशा दोन जागा पालिकेने उपलब्ध करून दिल्या असून दोन्ही ठिकाणी मिळून १७ स्टॉल्स आहेत. दर रविवारी हे बाजार भरणार असल्याने या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे
सदाभाऊ खोत म्हणाले कि पणन विभागाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही योजना यशस्वी केली असून १२५ आठवडी बाजारांत नाशिक, पुणे, सांगली, सातारा अशा जिल्ह्यांतून शेतकरी थेट आपल्या शेतातून भाजी आणून विकत आहेत त्यामुळे त्यांना कुठल्याही दलालीशिवाय फायदा होत आहे . तर दुसरीकडे ग्राहकांना शेतातील चांगला माल मिळतो आहे.
पुढील काळात कडधान्य नियमनमुक्त होत असून त्यामुळे कडधान्ये, इतर डाळी अशी धान्ये थेट बाजारात आणण्याचे नियोजन असून त्यामुळे देखील ग्राहकांना चांगले धान्य मिळेल आणि शेतकऱ्यांचा नफाही वाढेल असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
याप्रसंगी प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी श्री घोडके, उपनिबंधक मीरा भाईंदर दिलीप चंदेल, पणन व्यवस्थापक गंभीरराव यांची देखील उपस्थिती होती.
———————————-
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ठाणे जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी 1 जानेवारी 2018 पर्यंन्त सहभागी व्हावे
ठाणे दि २०: प्रधानमंत्री पीक विमा योजना रबी हंगाम 2017-18 मध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 01 जानेवारी, 2018 पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येतील.
योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा