मुंबईत बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून 2500 रुग्णांना मिळाले जीवदान

नव्याने 30 बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्याच्या प्रक्रियेस वेग

मुंबई- मुंबईत प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आठ महिन्यात अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. प्राथमिक उपचारानंतर अत्यावश्यक सेवेच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी यातील काही रुग्णांना संदर्भीत करण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत बाईक ॲम्बुलन्स तत्काळ प्रतिसाद देणारी ठरली आहे. 

मुंबईमध्ये ऑगस्ट 2017 मध्ये 10 बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्यात आली. अल्पावधीतच या सेवेसाठीच्या 108 क्रमांकावर दिवसाला शेकडो कॉल येत आहेत. विशेषत: रेल्वे स्टेशनचा परिसर, चिंचोळ्या गल्ली अशा ठिकाणाहून कॉल येण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत भांडूप, मानखुद, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगांव, ठाकुर व्हिलेज, कलिना आणि खारदांडा या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्स तैनात  करण्यात आल्या आहेत.  

ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या कालावधीत 2500 हून अधीक रुग्णांना बाईक ॲम्बुलन्सने तत्काळ प्रतिसाद आणि प्राथमिक उपचार देऊन त्यांना जीवदान दिले आहे. त्यामध्ये अपघातातील जखमी अशा रुग्णांची संख्या 267 असून विविध वैद्यकीय आपत्कालीन मदतीसाठी 1379 रुग्णांना प्रतिसाद देण्यात आला आहे. बाईक ॲम्बुलन्सवरील चालक डॉक्टर असल्याने कॉल येताच तत्काळ प्रतिसाद दिला जातो. रुग्णाची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार करुन आवश्यकता भासल्यास त्याला पुढील उपचाराकरिता संदर्भीत केले जाते.त्यामुळे मुंबईत या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला सुमारे 100 पेक्षा अधिक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात.

गेल्या वर्षी सॅण्डहर्स्ट् रोडवर इमारत कोसळल्याच्या घटनेत नागपाडा पोलिस स्टेशनजवळ असलेल्या बाईक ॲम्बुलन्सने घटना स्थळाकडे धाव घेतली आणि या ठिकाणी जखमी झालेल्या पाच रुग्णांना तातडीने प्रतिसाद दिला. अशा प्रकारच्या अनेक दुर्घटनांमध्ये बाईक ॲम्बुलन्सने महत्वाची कामगिरी बजावली आहे. 

मुंबईत अजून 10 तर राज्यात 20 बाईक ॲम्बुलन्स नव्याने सुरू करणार- आरोग्यमंत्री

मुंबईत बाईक ॲम्बुलन्सला लाभलेला प्रतिसाद पाहता. राज्यात नव्याने 30 बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले. पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट या डोंगराळ भागात 20 बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात येणार आहे. त्याच बरोबर अजून 10 बाईक ॲम्बुलन्स मुंबई मध्ये सुरु करण्यात येणार आहे. दुर्गम भागात चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही अशा परिस्थितीत बाईक ॲम्बुलन्स या भागासाठी वरदान ठरेल असे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email