मित्राचं न ऐकणं पडलं महागात, पाण्याचा अंदाज न आल्याने गेले वाहून
पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले आहेत. तर यातील एक तरूण सुरक्षित आहे. तुषार गांगड (१४), विवेक कुमावत (१५)वर्षे अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत. तर तिसरा मुलगा सार्थक भवर पाण्यात न उतरल्याने त्याचा जीव वाचला आहे. सार्थकने या दोघांनाही पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला होता पण तुषार आणि विवेकने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पाण्यात उड्या टाकल्या.
पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून या दोन्ही तरूणांना शोधण्याच काम सुरू आहे. दरम्यान, यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोहण्यासाठी गेलेले हे तिनही तरूण अल्पवयीन आहेत. त्यात अतिउत्साहात दोघांनी पाण्यात पोहण्यासाठी उडी घेतली पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही वाहून गेले आहेत. या तिनही मुलांचे पालक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दोघांनाही शोधण्यासाठी शोधकार्याचा वेग वाढवण्यात आला आहे.