माता न तू वैरिणी! पोटच्या दोन चिमुरड्यांना आईने बुडवून मारले..
बीड – घरातील वाद आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने तणावात असलेल्या दीपाली राधेश्याम आमटे ( वय २३) या महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलींना घरातील हौदात बुडवून मारले. ही धक्कादायक घटना बीड शहरातील नरसोबानगर भगत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत झालेल्या मुलींची नावे गायत्री आणि मुन्नी अशी आहेत.यातील मुन्नी तर अवघ्या चार वर्षाची आहे.
सोमवारी घरातील सर्व व्यक्ती बाहेर गेले होते. पती हा रिक्षा घेऊन बाहेर गेला होता. कामावरुन रात्री घरी आल्यावर राधेश्यामला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत. त्यांनी शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर त्याने शिवजीनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आणि घरी आला. त्यानंतर सकाळी हौदातील पाणी काढताना दोन चिमुकल्या हौदात अढळून आल्या. या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी निर्दयी मातेला अटक केली.