मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या भोजन,निवास खर्चाचा प्रश्न सोडविणारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
(म.विजय)
३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा
ठाणे दि.०३ – मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे.
जे विद्यार्थ्यी ठाणे शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांच्याकडे ३१ ऑगस्टपर्यंत संबधित जवळच्या वसतीगृहाशी संपर्क साधून त्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, उज्वला सपकाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधीत शासकीय वसतिगृह अधीक्षक / जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे ५ वा मजला, जिल्हाधिकारी इमारत, कोर्ट नाका, ठाणे (प.) दुरध्वनी क्र. : २५३४१३५९ कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १०वी / १२वी / पदवी /पदवीका परिक्षेमध्ये ०५ % पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ४० टक्के असेल.
विद्यार्थ्यांना वार्षिक भोजन भत्ता रुपये ३२०००,निवास भत्ता रुपये २००००, निर्वाह भत्ता रुपये ८००० मिळेल. एकुण ६० हजार रुपये मिळतील. वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु.५००० व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.२०००इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.