मांजरसुंबाजवळ शिवशाही बसला अपघात; १७ प्रवासी जखमी
(म.विजय)
बीड दि.०३ – भरधाव टिपर आणि शिवशाही बसच्या अपघातात १७ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना बीड तालुक्यातील मांजरसुंबा शिवारात काल पहाटे १.४५ वाजताच्या सुमारास घडली. नऊ प्रवाशांवर प्राथमिक उपचार करुन सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत आठ लोकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीड तालुक्यातील केज-मांजरसुंबा राज्य मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ताकाम सुरु आहे. रात्रीच्यावेळीही या मार्गाचे काम सुरु असते. सोमवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास मुरमाने भरलेले एक टिप्पर दुसर्या भरावावर चढवित असताना ते अचानकपणे रिव्हर्स आले आणि रस्त्याच्या मधोमध येऊन थांबले. त्याच वेळी केज मार्गे येत असलेल्या नांदेड-पुणे (एमएच १४ जीजे ३६१) या शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. अचानकपणे टिप्पर समोर आल्याने चालकाला वाहन वळविण्यास थोडाही वेळ मिळाला नाही. या अपघातात एकुण १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नऊ प्रवाशांवर प्राथमिक उपचार करुन सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत आठ लोकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती बीड विभाग नियंत्रक अशोक पन्हाळकर यांनी दिली.
केज-मांजरसुंबा हा रस्ता अतिशय खडतर झाला असल्याने या मार्गावरुन मोठी वाहने चालविणे कठीण बनले आहे. रस्ताकाम वेगाने करण्याची मागणी सर्व सामान्यांतून होत आहे. याच राज्यमार्गावर एक महिन्यापूर्वी शिवशाही बसचा अपघात झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.