महिला आरपीएफच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये सेक्सरॅकेटचा पर्दाफाश
कल्याण दि.१३ – सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची घटना कल्याणमध्ये उघडीस आली असून महिला आरपीएफच्या सतर्कतेमुळे रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या दलालास पकडण्यात आले आहे. नोकरीसाठी बांगलादेशातून आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची गंभीर बाब या घटनेतून उघड झाली आहे. पीडित महिलेला बांगलादेशातून नोकरीसाठी विठ्ठलवाडी येथे आणले होते. ६ नोव्हेंबर रोजी महिला विठ्ठलवाडीत पोहोचली.
हेही वाचा :- डोंबिवलीत रात्री भंगार विक्रेत्याची हत्या
ज्या व्यक्तीने तिला विठ्ठलवाडी येथे आणले, त्याने तिला रहीम शेख नावाच्या व्यक्तीकडे नेले. रहीम तिला नोकरी लावणार, असे तिला सांगण्यात आले होते. रहीमने भावाच्या आणि त्याच्या मित्राच्या सोबतीने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, मुंबई येथील ग्रॅण्ट रोडला तिचा सौदा केला. त्यानंतर, पुन्हा तिला विठ्ठलवाडी येथे आणून सोडले. पीडित महिलेला ज्या ठिकाणी ठेवले, त्याच खोलीत अन्य पीडित महिलाही होती.
हेही वाचा :- ट्रेन प्रवासादरम्यान सहप्रवाशांना सिगारेट पिण्यास रोखल्याने महिलेची हत्या
पीडितेने तेथून पळ काढला. मात्र, तिचा पासपोर्ट रहीमकडे असल्याने त्याने तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. रहीमच्या सांगण्यानुसार पीडित महिला पुन्हा कल्याणला गेली. त्यावेळी फलाटावर रहीम एका अन्य महिलेशी बोलत होता. तिची भयभीत अवस्था महिला आरपीएफ शकिला बेगमने पाहिली. तिने आरपीएफ व रेल्वे पोलिसांच्या मदतीने रहीमला पकडले. तो सेक्स रॅकेट चालवतो, अशी माहिती समोर आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.