महावितरणने पनवेल परिसरात पकडल्या ३३ लाखाच्या वीज चोऱ्या

चार महिन्यांत १३० वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई

कारवाईत तळोजातील गर्भश्रीमंत ग्राहकांचा समवेश

पनवेल दि.०८ – महावितरणच्या पनवेल विभागाअंतर्गत येणाऱ्या पनवेल-१ (भिंगारी) उपविभागात अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत चार महिन्यात १३० वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई केली आहे. एप्रिल ते जुलै या कालवधीत ही कारवाई करण्यात आली असून या तीन लाख सात हजार युनिटच्या वीजचोरीचे मुल्य सुमारे ३३ लाख ८६ हजार इतके आहे. महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून आलेल्या अहवालानुसार भिंगारी, तळोजा, नेरा, वावंजे, पारगाव आदी परिसरात महावितरणच्या वीज हानीत वाढ झाली होती. त्यामुळे महावितरणची यंत्रणा या परिसरातील संशयीत ग्राहकांवर नजर ठेवून होती. वीज चोरी करताना संबंधित ग्राहक वीज मीटरशी छेडछाड करणे, मीटरमध्ये रीमोट कंट्रोल बसवणे, डायरेक्ट वीज पुरवठा घेणे अशा पद्धतींचा वापर केला होता. पण महावितरणच्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे या चोऱ्या पकडल्या जात आहेत.

पनवेल विभागाच्या भिंगारी या उपविभागातील तळोजा या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जात होती. यामध्ये या गावातील गर्भश्रीमंत ग्राहकांचा प्रामुख्याने समावेश होता. या वीज चोरीमुळे महावितरणच्या वीज हानीचे प्रमाण वाढले होते. यामुळे भांडूप नागरी परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, वाशी मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, पनवेलचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड व अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी या वरिष्ठ अधिकार्यांनी जातीने हजर राहून कारवाई केली आहे.

‘वीजचोरी सापडल्यास ग्राहकांना दंडासह रक्कम भरावी लागते. तसेच वीजचोरीच्या स्वरुपानुसार ग्राहकांवर पोलीस केसही केली जाते. याचबरोबर वीजचोरी करताना अपघात घडून जीवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरी करू नये असे आवाहन भांडूप नागरी परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी केले आहे. याचबरोबर वीज चोरांवर कारवाई करण्याची प्रक्रिया येथून पुढे नियमित चालू राहणार असल्याचे मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

महावितरणच्या या मोहिमेत शशांक पानतवणे, मारुती बिवे, प्रमोद कुंभार, आदित्य धांडे, प्रशांत राठोड, सागर सूर्यवंशी, सचिन शिंदे, महादेव पानगळे, नसीम खान आदी अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email