महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेला साडेबावीस लाखांचा गुटखा पकडला

अंबाजोगाई – कर्नाटक राज्यातील हुमनाबाद महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटखा अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकाने समयसूचकता दाखवत घाटनांदूर जवळ पकडला. यावेळी गुटखा आणि ट्रक  असा एकूण ३२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एएसपी बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक दादाराव वाघमारे, कर्मचारी नागरगोजे आणि मस्के हे दुपारी एका गुन्ह्याच्या तपासानिमित्त परळीकडे निघाले असताना त्यांना घाटनांदूर रेल्वे पटरीच्या अलीकडे पेट्रोल पंपाजवळ एक टेम्पो (एमएच ०३ सीपी ४२५४) संशयास्पद अवस्थेत आढळून आला. संशय बळावल्याने पथकातील पोलिसांनी टेंपोची झडती घेतली असता आतमध्ये २२ लाख ५० हजार रुपयांच्या गोवा गुटख्याचे ५० पोते आढळून आले.

पोलिसांनी टेंपो चालक जगदीश रामचंद्र गौडा (रा. बेंगलोर) आणि बबलु सालम शेख (रा. मुंबई) या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता हा गुटखा महाराष्ट्रातच कुठेतरी द्यायचा आहे, मात्र तो कोणी पाठविला आहे आणि कोणाकडे द्यायचा आहे याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी साडे बावीस लाखांचा गुटखा आणि दहा लाखांचा टेंपो असा एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. ग्रामीण पोलिसांनी पत्राद्वारे सदरील माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास कळविली. त्यांनतर अन्नसुरक्षा अधिकारी ऋषिकेश रमेश मरेवार यांनी अंबाजोगाई येथे येऊन संपूर्ण गुटखा ताब्यात घेतला.

याप्रकरणी ऋषिकेश मरेवार यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र गौडा, बबलु सालम शेख आणि टेम्पो मालक फरीद शमशुद्दीन शेख (रा. मुंबई) या तिघांवर कलम  १८८, ३, ३२८ ; अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम  १६, ४, १८ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी गुंड हे करत आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यालायासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक दादाराव वाघमारे, कर्मचारी नागरगोजे आणि मस्के यांनी पार पाडली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email