महाराष्ट्रात राष्ट्रीय टपाल सप्ताह 9 ते 15 ऑक्टोबर 2018 साजरा केला जाणार
मुंबई, दि.०९ – जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल विभाग 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहेत. महाराष्ट्रातील 1293 टपाल कार्यालये आधार केंद्र म्हणून काम करत असून त्यांनी आतापर्यंत 50,594 वैयक्तिक आधार क्रमांक जारी केले असून 4 लाखांहून अधिक आधारक्रमांकांचे अद्ययावतीकरण केले आहे, असे महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच.सी.अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 16 टपाल कार्यालये पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र म्हणून काम करत असून पासपोर्टसंबंधी सेवा पुरवतात.
अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने महाराष्ट्र परिमंडळात आतापर्यंत 78 हजार खाती उघडली आहेत. आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी टपाल कार्यालयाने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (एमएसईडीसीएल) आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या सहकार्याने आतापर्यंत 32 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
टपाल कार्यालयाने महाराष्ट्र परिमंडळात कोअर बँकिंग सोल्यूशन, एटीएम, कोअर सिस्टीम इंटिग्रेशन, कोअर इंन्शुरन्स सोल्यूशन आणि दर्पणसंबंधी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त महाराष्ट्र परिमंडळाने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथे खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
9.10.2018 (जागतिक टपाल दिन) – टपाल कार्यालय परिसरात बैठकांचे आयोजन, शालेय विद्यार्थ्यांची टपाल कार्यालयाला भेट
10.10.2018 (बँकिंग दिवस)- बचत बँक मेळावे/शिबिरांचे आयोजन, एपीवाय, एसएसवाय, पीएमएसबीवाय,पीएमजेजेवायसाठी नोंदणी सेवा उपलब्ध
11.10.2018 (पीएलआय दिन)- नवीन टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा घेण्यासाठी मेळावे, शिबिरं, प्रत्यक्ष भेट अभियान, दृकश्राव्य माध्यमातून प्रसाराचे आयोजन
12.10.2018 (फिलाटेली दिवस)-शाळा आणि उद्योगांना ‘माय स्टॅम्प’ सुविधा पुरवण्यात येणार
13.10.2018 (उद्योग विकास दिन)- टपाल व्यवहार वाढवण्यासाठी विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांबरोबर संवाद
15.10.2018 (पत्र दिन)-शालेय विद्यार्थ्यांचा टपाल कार्यालयांमध्ये दौरा आणि पोस्टमनशी हितगुज