मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी ९ ऑगस्ट पासून व्यापक जनआंदोलन
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी ९ ऑगस्ट २०१८ पासून राज्यातील मराठा क्रांती मोर्चा व्यापक जनआंदोलन हाती घेईल. महिला, मुलेबाळे, गुराढोरांसह प्रत्येक गाव, शहरात आंदोलन होईल. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापनाही बंद केल्या जातील.
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा देत एक, दोन दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंर्त्यांच्या घरांसमोर ठिय्या देण्याचे सूतोवाच राज्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने पत्रपरिषदेत केले.
परिषदेस २२ जिल्ह्यांतील समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी राज्याच्या समन्वय समितीची राहिचंद्र मंगल कार्यालयात बैठक झाली. बैठकीत ९ ठराव घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पहिला मोर्चा २०१६ मध्ये औरंगाबादेत काढण्यात आला होता. मोर्चे शांततेत निघाल्याने मुख्यमंर्त्यांनी एकही मागणी पूर्ण केली नाही.
५ कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले नाही. शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचेही टाळले. मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री नकारात्मक दिसत आहेत. पुंढरपूरच्या आषाढी वारीत मुख्यमंर्त्यांनी वारकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा समाजावर केला. या आरोपाचा समितीने निषेध केला.