मनातील वाईट विचार व सवयी जाळून विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळीवेगळी होळी
डोंबिवली – होळी या सणाला एक वेगळच महत्व आहे.होळीच्या अग्नीत वाईट गोष्टींचा नाश केला जातो. डोंबिवलीतील एका शाळेत एक अशीच आगळीवेगळी होळी साजरी करण्यात आली.पिसावली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही होळी साजरी करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आपल्या वाईट सवई तसेच विचार एका कागदावर लिहून होळीत त्यांचे दहन केले.
होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात यामुळे पर्यावरणाची हानी होते.तसेच होळी सण साजरा करतांना सामाजिक भान ठेवले जात नाही.पाणी वाया घालवला जातो. केमिकल मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहचवली जाते. हे
होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत यासाठी पिसवली शाळेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजूबाजूचा कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केली. त्यातच मुलांनी आपल्या मनातील वाईट
विचार जाळून होळी उत्सव साजरा केला. यावेळी गावचे माजी सरपंच प्रल्हाद भोईर, शाळा सुधार समीतीचे अध्यक्ष विलास भोईर यांच्या उपस्थितीत मुलींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.
या अगोदर शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची विज्ञानाशी सांगड घालून माहिती दिली. सविता नवले यांनी इकोफ्रेंडली रंग तयार केले. महेंद्र अढांगळे यांनी पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. शर्मिला गायकवाड, मंगला अंबेकर, हर्षद खंबायत, कुसुम भंगाळे, लतिका राऊत, स्मिता धबडे, स्मिता कांबळे यांनी मुलांना होळीकेची कथा तसेच या सणाचे महत्व आणि इकोफ्रेंडली होळी कशी खेळावी याची माहिती दिली. प्रल्हाद भोईर यांनी शुभेच्छा देऊन पारंपारिक होळीचे समाजातील महत्त्व मुलांना पटवून दिले.विलास भोईर यांनी गावागावात चालणाऱ्या होळीपेक्षा पिसवली शाळेतील आगळया
वेगळ्या होळीचे कौतुक केले. झाडे लावा, झाडे जगवा , इकोफ्रेंडली धुळवड हा संदेश यावेळी देण्यात आला. अजय पाटील यांनी नैसर्गिकपणे होळी खेळण्याची शपथ मुलांना दिली. गेली अकरा वर्षे हा नाविन्यपूर्ण पण पारंपारिक होळीचा सण पिसवली शाळेत साजरा केला जात आहे. इयत्ता पहिलीची मुलगी साक्षी शिंदे हिच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.शेवटी नैसर्गिक व कोरडया रंगाने धुळवड साजरी करून मुलांनी, शिक्षक व गावकऱ्यांसोबत आनंद लुटला. या उपक्रमाचे कौतुक गावकऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी केले आहे.