मनसेचा महानगरपालिकेवर हजारोंचा “चले जाव” मोर्चा
निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ५ जणांचा नाहक बळी गेल्याच्या निषेधार्थ मनसेने आज भव्य मोर्चा काढत कल्याण डोंबिवली महापालिकेवर धडक दिली. कल्याण डोंबिवलीला खड्ड्यात घालणारे सत्ताधारी ‘चले जाव’ या ब्रीदवाक्याखाली काढण्यात आलेल्या मोर्चातून मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिसर दणाणून सोडला.
कल्याण एमपीएमसी मार्केट येथून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तर खड्ड्यात पडून जखमी झालेले काही कल्याण डोंबिवलीकर नागरिकांनीही मोर्चात भाग घेत पालिकेविरोधातील आपला रोष व्यक्त केला. “राम नाम सत्य है..सत्ताधारी पैसे खाण्यात व्यस्त है…२२ वर्ष केले काय- खाली डोकं वर पाय…१०० नगरसेवक, २ खासदार, २ मंत्री..एवढी माणसं करतात काय? …खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा शिवसेना भाजप भ्रष्टाचाराचा अड्डा” आदी प्रकारची जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत शहरातील खड्डे आणि त्यामुळे गेलेल्या बळींप्रकरणी प्रशासनाला।चांगलेच धारेवर धरले. आणखी किती काळ आम्ही हा त्रास सहन करायचा? आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे? याप्रकरणी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत अनेक प्रश्नांची सरबत्ती पालिका आयुक्तांवर करण्यात आली. तसेच खड्डे बुजवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेने आयुक्तांना १५ दिवसांची डेडलाईन दिली आहे.