भुजबळांचे आज नागपूर विमानतळावर भाषण
(म.विजय)
नागपूर दि.०८ – सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रदीर्घ काळ कारागृहात काढल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात आगमन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आगमनानंतर ते विमानतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील. यानंतर त्यांचे छोटेखानी भाषण होणार आहे. भुजबळ त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गुरुवारी येणार होते. मात्र, प्रकृतीमुळे त्यांचा दौरा तीन दिवस लांबला. एरवी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भुजबळ पावसाळी अधिवेशनात कसा करिश्मा दाखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भुजबळ यांचे आगमन झाल्यानंतर खुल्या जीपमधून मिरवणुकीद्वारे त्यांना शहरात आणण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, परिषदेचे नेते दिवाकर गमे, अॅड. बाबुराव बेलसरे, अलका कांबळे, श्याम चौधरी, आदींच्या नेतृत्वाखाली स्वागताची तयारी करण्यात आली आहे.