भावाच्या निधनाने दुःख हृदयात ठेवून दिली होती परीक्षा ; मिळविले ९४ टक्के गुण

अंबाजोगाई – ऐन परिक्षेच्या कालावधीत घरात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याचा प्रतिकुल परिणाम साहजिकच विद्यार्थ्याच्या परिक्षेवर झाल्याशिवाय राहत नाही. परंतू अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनी कु.वैष्णवी कल्याण काळे हिने आपल्या मोठ्या भावाच्या निधनाचे दु:ख हृदयात ठेवून इयत्ता दहावीची केवळ परिक्षाच दिली नाही तर आई वडिलांना धीर देत या परिक्षेत ९४.२० टक्के गुण मिळविले आहेत.कु. वैष्णवीच्या अभ्यासाला आणि तिने परिक्षा दरम्यान दाखविलेल्या समयसुचकतेला सलाम करावाच लागेल.

इयत्ता दहावीच्या परिक्षेत अंबाजोगाईच्या खोलेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी कु.वैष्णवी काळे हिने ९४.२० टक्के गुण संपादन केले आहे. या परिक्षेत अनेकांनी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मोठ्या आकड्यापर्यंत वाढविली असली तरी वैष्णवीच्या ९४.२० टक्के गुणाला आज मानाचे स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही. कु.वैष्णवी हिची दहावीची परिक्षा चालू असतांनाच तिचा मोठा योगेश काळे (वय १९) हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत काम करीत असतांना झालेल्या अपघातात मरण पावला होता. ही घटना २१ मार्चची असून याच कालावधीत कु.वैष्णवीने दहावीचे काही पेपर दिले होते. उर्वरित पेपर देत असतांनाच काळाने घाला घातला आणि तिच्या भावाचे निधन झाले. परंतू तिने या निधनाचे दु:ख मनात ठेवीत एवढेच नाही तर आई वडिलांची समजूत घालीत दहावीचे उरलेले पेपर दिले. विशेष म्हणजे वडिल मजूरी तर आई घरकामे करून आपली उपजिवीका भागवतात.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत कु.वैष्णवीने दहावीच्या परिक्षेत ९४.२० टक्के गुण मिळविले आहेत. तिला सर्वाधिक १०० पैकी १०० गुण अत्यंत अवघड असलेल्या गणित या विषयात मिळाले असून आता भविष्यात पुढील शिक्षणाचे गणित जुळविण्यासाठी कु.वैष्णवीला मदतीची गरज आहे. जिल्ह्यातील समाजसेवी संस्थांनी वैष्णवीला आर्थिक मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email