भारत सरकार आणि प्रसिद्धीमाध्यमामुळे सुखरूप सुटलो कौस्तुभ आणि रोहन वैद्य यांनी मानले आभार

डोंबिवली दि.१२ – आमचे अपहरण झाल्यावर आमच्याकडे अपहरणकर्त्यांनी १ कोटीची मागणी केली होती. त्यानंतर चार दिवस डांबून ठेवले. आमचे हात आणि डोळे बांधून मारहाण केली. आम्हाला बहुतेक जंगलात ठेवले असावे. मलेशियन पोलीस, भारतीय पोलीस, हायकमिशन कार्यालय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत सरकार आणि प्रसिद्धीमाध्यमामुळे सुखरूप सुटलो. असा प्रांजल अनुभव कौस्तुभ आणि रोहन वैद्य यांनी डोंबिवलीत पत्रकारांसमोर व्यक्त केला. मात्र अपहरण कर्त्यांना आमची नावे माहित असल्याने त्यांनी चुकून आमचे अपहरण केले नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आमच्याकडे एवढे पैसे नसताना त्यांनी एवढ्या पैशांची मागणी कशी केली याबद्दल प्रश्न पडल्याचेही सांगितले.

मत्सव्यवसाय बाबत बैठकीसाठी मलेशियात गेलेल्या डोंबिवलीतील कौस्तुभ आणि रोहन वैद्य यांचे २ ऑगस्ट रोजी अपहरण झाले होते. त्यांचे हाल केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना चार दिवसांनी सोडून दिले. शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील सेंटर रेल्वे सहकारी सोसायटीत राहणाऱ्या या दोन भावांनी पत्रकारांशी संवाद साधला. मलेशियात असताना एका मिटिंगला गेलो होतो. मात्र अचानक आमची गाडी अडवून काही जणांनी आम्हांला पडकले. अपहरणकर्त्ये तमिळ भाषेत बोलत असल्याने आम्हाला काहीच समजत नव्हते. त्याच्यातील एक व्यक्ती इंग्रजी भाषेत बोलत होती. अपहरणकर्त्यांनी आमच्याकडे १ कोटीची मागणी केली. परंतु आमच्याकडे एवढे पैसे नसल्याने त्यांनी कुटुंबियांना फोन करून पैसे मागा असे धमकावले.

आम्ही काका – राजू वैद्य यांना फोन करून आमचे अपहरण झाले असून १ कोटीची मागणी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर राजू वैद्य यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. भारत सरकारला याची माहिती समजल्यावर त्यांनी मलेशियातील पोलिसांशी संपर्क साधून अपहरण झालेल्या वैद्य बंधूना सोडविण्यासाठी प्रयत्न केले. वैद्य बंधू गेली तीन वर्ष मलेशियात व्यवसाय करत असून १ कोटी अपहरणकर्त्यांना देऊ शकतील इतके पैसे त्याच्याकडे नव्हते. अपहरणकर्त्यांना त्याच्याकडील आधार कार्ड, पाकीट ,अंगठी क्रेडीट कार्डमधून सुमारे ६६ हजार रुपये काढून घेतले होते. आपली आता सुटका नाही असे वैद्य बंधूना वाटले होते. मात्र चार दिवसांनी अपहरण कर्त्यांनी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून एका सुनसान रस्त्यावर सोडले.

आपल्या देशात परत आलो असून भारत सरकार आणि येथील प्रसिद्धी माध्यमामुळे आपला जीव वाचल्याचे सांगताना वैद्य बंधुंच्या डोळ्यातून अश्रू आले होते. पुन्हा मलेशियात व इतर सभोवतालच्या देशात दिसलात तर याद राखा अशी धमकी अपहरण कर्त्यांनी दिली होती. मात्र मलेशियन पोलिसांनी संरक्षणाची हमी दिल्याने आम्ही पुन्हा व्यवसायासाठी नक्की जाऊ असा निर्धार वैद्य बंधुंनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.