भारत-म्यानमार वाहतूक प्रकल्पाच्या प्रगतीविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि म्यानमारचे मंत्री यु थांट सिन माँग यांच्यात चर्चा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि म्यानमारचे दूरसंवाद आणि वाहतूक मंत्री यु थांट सिन माँग यांच्यात आज नवी दिल्लीत, भारत-म्यानमार वाहतूक प्रकल्पाच्या प्रगतीविषयी चर्चा झाली. भारत-म्यानमार-थायलंड महामार्गाच्या कालेवा-याग्यी या पटट्याच्या सुधारणा प्रकल्पाची स्थिती, इंफाळ-मंडालय बस सेवा सुरु करणे आणि दोन देशादरम्यानच्या द्विपक्षीय मोटर वाहन कराराबाबत यावेळी दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली.
कालेवा-याग्यी पट्टयाच्या सुधारणेचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम वेळेनुसार सुरु असून निर्धारित वेळेच्या आधीच हे काम पूर्ण होईल अशी आशा प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. इंफाळ-मंडालय बस सेवा लवकरच सुरु करण्याबाबत दोन्ही बाजूंनी उत्सुकता दर्शवली आहे. उभय देशादरम्यान द्विपक्षीय मोटार वाहन करारावर स्वाक्षऱ्या करण्याबाबत दोन्ही देशांनी उत्सुकता दर्शवली असून या कराराच्या मसुद्यावर चर्चा सुरु असून लवकरच त्याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.