भारत-अझरबैंजन यांच्या व्यापार आणि आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यावरील प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली, दि.१३ – व्यापार आणि आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यावरील भारत-अझरबैंजन आंतर सरकारी आयोगाची पाचवी बैठक 11 आणि 12 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्लीत पार पडली. केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि अझरबैंजनचे नैसर्गिक संपदा मंत्री मुख्तार बाबायेव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत उभय नेत्यांनी चर्चा केली तसेच व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य तसेच द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा आढावा घेतला. उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.
उभय देशांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट 2018 दरम्यान 657.9 द.ल. अमेरिकन डॉलर्स एवढा व्यापार झाला. क्षमतेपेक्षा द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण कमी असून सहकार्याचे क्षेत्र वाढवून द्वीपक्षीय व्यापार वाढवण्याची गरज दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये आर्थिक घडामोडींबाबत जनजागृती करण्यासाठी व्यापार प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.