भारतीय संस्कृती मानवतेवर आधारित; महात्मा गांधी त्याचे प्रतिक : मृदुला सिन्हा

पणजी, दि.०२ – ‘भारतीय संस्कृती हि मानवतेवर आधारलेली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याचे प्रतिक आहेत. सत्याग्रह, स्वावलंबन, स्वच्छता, स्वानुभव यावर आधारित गांधीजींची जीवनशैली कायम प्रेरणादायी आहे, अशा शब्दात गोवा राज्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘भावांजली’ कार्यक्रमामध्ये त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या.

गोवा राजभवन मधील दरबार हॉल येथे माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये भजनातून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहली. रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमामध्ये सादर झालेल्या गीतांमध्ये भारतीय संस्कृतीच्या सर्व सूत्रांना गुंफण्यात आले होते; गांधीजींचे जीवनही असेच होते, असे उद्गार मृदुला सिन्हा यांनी यावेळी काढले. भारतीय संस्कृतीला खिंडार पडताना दिसले कि काही लोक उभे राहतात आणि संस्कृतीचे पुनरुथ्थान करतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्याप्रमाणे पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण केले जाते, त्याचप्रमाणे राष्ट्रपुरुषांचे स्मरण व्हावे, त्यांचे संस्कर, पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे, अशी अपेक्षा मृदुला सिन्हा यांनी व्यक्त केली. गांधीजींचे कार्य, दृष्टीकोन यांचे स्मरण यानिमित्ताने व्हावे. साध्याला अनुसरून साधन असले कि लक्ष्य प्राप्ती निश्चित होते, हि शिकवण गांधीजींच्या आयुष्यातून आपल्याला मिळते, असे देखील त्या याप्रसंगी म्हणाल्या. स्वावलंबी कुटुंब, गाव यासाठी अंगभूत कौशल्याचा आधार घ्यावा, असे आवाहन मृदुला सिन्हा यांनी केले. गांधींच्या स्वप्नातील भारत उभा राहण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या निमित्ताने पत्र सूचना कार्यालय, पणजीच्या अपर महा निदेशक अर्मेलिंदा डायस व रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना ‘गांधीजी इन चंपारण’ हे डी. जी. तेंडूलकर लिखित इंग्रजी पुस्तक भेट म्हणू दिले.

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, राज्यचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरून सहानी, माजी केंद्रीय मंत्री रामकृपलानी सिन्हा आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणेच्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. पत्र सूचना कार्यालय, पणजीच्या अपर महा निदेशक अर्मेलिंदा डायस यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.