भारतीयांना उद्धवस्त करण्यासाठी पाकचा माल आयात – जितेंद्र आव्हाड

पाकिस्तानी साखर आयातप्रकरणी आ. आव्हाडांनी घेतला भाजप सरकारचा समाचार

ठाणे (प्रतिनिधी)-  भारतीयांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजप सरकारने आखले आहे. मात्र, त्यांचे हे धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आज आमचा ऊस उत्पादक शेतकरी हमी भावासाठी रडत असताना पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले जात असेल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही. पाकची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजार भावापेक्षा 1 रुपयांनी कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आ. आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यामधील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात करीत असल्याची माहिती सभागृहाला दिली होती. आता हीच साखर बाजारात विकली जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानच्या नावाने बोंब ठोकायची आणि त्यांच्याच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पाकिस्तानी साखर आयात करायची; म्हणजेच आपली अर्थव्यवस्था मेली तरी चालेल;पण, पाकिस्तानची अर्थव्यवस्था जगली पाहिजे,  अशी दुहेरी नीती या सरकारने आखली आहे. त्यांचे हे बेगडी राजकारण आता उघडकीस आले आहे. या आधी पाकिस्तानी कांदा भारतात आणून आमच्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना देशोधडीला लावले होते. आता साखर आणून आमच्या ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट भाजप सरकारने आखला आहे. त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ही पाकिस्तानी साखर आम्ही बाजारात विकू देणार नाही; आमचे जवान सीमेवर पाकिस्तानच्या गोळ्या झेलून शहीद होत असतानाच पाकिस्तानची मदत घेऊन भारतीयांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा हा कट आहे, असा आरोप करुन आता यांना ऊसाच्या चिपाडानेच बडवण्याची वेळ आली आहे, असेही आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.