भारतातल्या परिवर्तनाकडे लक्ष द्या – उपराष्ट्रपतींचे बोत्सवानातल्या भारतीयांना आवाहन

भारतात सध्या सुरू असलेल्या विस्मयजनक विकासात परदेशस्थ भारतीय आपले योगदान देऊ शकतात असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. ते बोत्सवाना येथे भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करत होते.

बोत्सवानातील भारतीय तिथल्या मुक्त लोकशाहीवादी बहुआयामी समाजात केवळ एकरूपच झाले नाहीत, तर त्यांनी बोत्सवानाच्या अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. भारतीय कुठेही राहिले तरी त्यांनी उत्तम कार्यच केले आहे, असे त्यांनी सांगितले.

परदेशी राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकार नेहमीच महत्व देत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही भारताचे सांस्कृतिक राजदूत आहात आणि जग तुमच्याकडे भारतीय मूल्ये आणि जीवनशैलीचे प्रतिनिधी म्हणून पाहते असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

भारतात वेगाने बदल होत असून व्यवसायाचे वातावरणही झपाट्याने बदलत आहे. भारतीयांनी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला असून आता भारतात होत असलेल्या विस्मयजनक विकासात त्यांनी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

परदेशस्थ भारतीयांनी जगापर्यंत भारताचा संदेश पोहोचवावा आणि भारतात होणाऱ्या प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी इतर देशांना भारतात आणावे, असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.