भायंदरपाड्यात उभी राहणार सर्वधर्मीय अत्याधुनिक स्मशानभूमी

(म.विजय)

ठाणे – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड येथील भायंदरपाड्यामध्ये सर्वधर्मियांसाठी अत्याधुनिक, सर्वसोयिनीयुक्त, पर्यावरणाभिमुख धूरमुक्त स्मशानभूमीची निर्मिती करण्यात येणार असून या जमीनीच्या मालकीचे हस्तातंरण आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे सुपूर्द केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड भाईंदर पाडा येथील सेक्टर क्र.६, स.नं. १०९ (पै), ४४ (पै), ४५ (पै), ४७ (पै) या सुमारे ७ एकर जागेवर ठाणे महापालिकेने राज्य शासनाच्या मान्यतेने सर्वधर्मीय स्मशानभूमीचे आरक्षण टाकले होते. त्याविरोधात मूळ जमीन मालकांच्यावतीने उच्च न्यालायात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ओवळा माजिवडा मतदार संघातील घोडबंदर परिसरात स्मशानभूमी, दफनभूमी व कब्रस्तान साठी जागा अपुरी पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीमुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी जागा मालकांसोबत चर्चा केल्यानंतर हि याचिका मागे घेण्यात आली व त्यामुळे सदरचे आरक्षण विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर विक्रमी वेळेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व कागदपत्रांची पूर्तता करून काल दि.०५ मार्च २०१८ रोजी सदरची जागा सातबारा उताऱ्यासह महापालिकेच्या नावे करण्यात आली आहे.

घोडबंदर परिसरात नवीन ठाणे निर्माण होत असताना या भागातील गेल्या अनेक वर्षापासून असलेली स्मशानभूमीची मागणी लक्षात घेता आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनी व भागीदारी संस्थेच्या मालकीची असलेली हि जागा महापालिका आयुक्तश्री.संजीव जयस्वाल यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या दि.०६/०३/२०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठरलेल्या धोरणानुसार या जागेवर हिंदू समाजासाठी ८००० चौमी, दाऊदी बोहरा समाजासाठी ३००० चौमी, ख्रिच्छन समाजासाठी ३००० चौमी, ज्यू समाजासाठी २००० चौमी, लिंगायत समाजासाठी २००० चौमी, अन्य धर्मियांसाठी ४००० चौमी, तसेच जैन धर्मगुरुंच्या अंत्यविधीसाठी ५०० चौमी जागा आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीवरून ठेवण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्य केले आहे. सदर संयुक्त स्मशानभूमी व स्मृती स्थळाच्या संकल्पनाचे सादरीकरण करण्यात आले असून त्यास मान्यताही देण्यात आली आहे. त्याचबरोबर उर्वरित जागेवर वाहनतळ व २ एकरहून अधिक जागेवर सुसज्ज स्मृतीस्थळ उभारण्यात येणार असून, महाराष्ट्रातील सर्वधर्मियांसाठी असलेले हे एकमेव स्मृतीस्थळ ठरणार आहे. तसेच सदरचे स्मृती स्थळ हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग व भागीदारी संस्थेच्या कन्स्ट्रकशन टीडीआर च्या माध्यमातून १८ महिन्यात उभारून निशुल्क महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून असलेला घोडबंदर परिसरातील स्मशानभूमीचा प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच महापालिकेच्या निधीतून रेप्टाकॉस व टिकुजीनीवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीतील अंतर्गत सजावट साहित्य व विद्युत दाहिनी बरोबरच अन्य उपकरणे सुद्धा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email